Wednesday 12 January 2011

कर्माबाईची खिचडी

आटपाट नगरात कर्माबाई नावाची सालस, भाविक स्त्री राहात असते. कष्ट करावेत, दुसर्‍याला आनंदी करावे, स्वत: आनंदी राहावे असा तिचा जीवन क्रम चाललेला असतो. अशी ही पराकोटीची सात्विक, सज्जन बाई रोज पहाटे उठल्याबरोबर कामाला सुरुवात करत असे. नित्यनेमाने देवाचे नामस्मरण करत असे. सर्व पहाटेची कामे उरकली की देवासाठी तांदळाची खिचडी करत असे आणि गावदेवतेला भक्तीभावाने नेऊन अर्पण करत असे. मग परत येऊन आन्हिके आटपून शेतावर कामाला जात असे.

मात्र एके दिवशी कर्माबाईकडे तिची एक लांबची नातेवाईक राहायला येते. ती सर्व हा दिनक्रम बघते आणि कर्माबाईला म्हणते, "कर्माबाई, अगं तुला काही लाजलज्जा आहे की नाही. पारोश्यानेच बनवलेली खिचडी देवाला प्रसाद म्हणून देतेस. कुठे फेडशील हे पाप?". कर्माबाई चपापते, मनाशी विचार करते, खरेच की आतापावेतो आपल्या लक्षातच आले नव्हते. नकळत का होईना आपल्याकडून आगळिक घडली म्हणायची.

मग ती दुसर्‍या दिवशीपासून आपला दिनक्रम बदलते. अंघोळ करून, नीट वेणी फणी करून, खिचडी बनवून देवाला न्यायला लागते. असे काही दिवस जातात. हा नवीन दिनक्रम कर्माबाईच्या अंगवळणी पडतो.

पण एके दिवशी कर्माबाईच्या स्वप्नात एक नितळ, नितांतसुंदर पुरुष येतो आणि कर्माबाईला प्रेमाने म्हणतो, "कर्मे ! मला नाही का ओळखलेस? अगं मी तोच देव ज्याचे तू नामस्मरण करतेस, ज्याला रोज खिचडीचा नैवेद्य दाखवतेस".

साक्षात् परमेश्वराचे दर्शन घडल्याने कर्माबाईला धन्य धन्य होते. ती संकोचाने विचारते, "देवा आज माझ्या स्वप्नात कसे काय येणे केले?". देव म्हणतो, "कर्मे, अगं मला तांदुळ - मुगाच्या डाळीची खिचडी अतिशय आवडते आणि अशी खिचडी खायला घालणारे भक्त तर त्याहून जास्त आवडतात" (* नोंद घ्यावी) आणि तू खिचडी बनवतेस पण छान. मात्र आताशा मला तुझ्या खिचडीसाठी खूप वाट पाहावी लागते. त्यापेक्षा तू पहाटे पहाटे पारोश्यानेच खिचडी आणत होतीस तेच किती चांगले होते. उद्या पासून मला तांबडे फुटल्याबरोबर तुझ्या हातची पारोश्यानेच केलेली खिचडी हवी.

अशी ही पाचा उत्तरी कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण.

कथाबीज स्रोत - शांताबाई शेळके.

* माँ मृदुलानंदमयींना पण तांदुळ - मुगाच्या डाळीची खिचडी अतिशय आवडते आणि अशी खिचडी खायला घालणारे भक्त तर त्याहून जास्त आवडतात. कळावें, लोभ असावा ही विनंती.

No comments:

Post a Comment