Wednesday 12 January 2011

बाभळी

लवलव हिरवीगार पालवी काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करिती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी

झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे
त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे

कुसर कलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागररिती
दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी

अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनीया मन रमते तेथे सांज सकाळी

येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे

- कवयित्री इंदिरा संत

मानसा मानसा,
तुझी नियत बेकार,
तुझ्याहून बरं
गोठ्यातील जनावर (मानूस)

पाहीसनी रे लोकाचे
यवहार खोटे नाटे
तव्हा बोरी बाभयीच्या
आले अंगावर काटे (हिरिताचं देनं घेनं)

- बहिणाबाई चौधरी.

सागर


आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गल्बते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलून घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे

कवी - कुसुमाग्रज

प्रिय गुरुजी

प्रिय गुरुजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा
जगात प्रत्येक बदमाशागणिक
असतो एक साधुचरित पुरुषोत्तम.
स्वार्थी राजकारणी असतात जगात
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.

मला माहित आहे
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत...
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा त्याला विजयाचा आनंद संयमाने घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला

गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !

जमेल तेवढं दाखवित चला त्याला
ग्रंथ भाण्डाराचं अद्भुत वैभव,
मात्र त्या बरोबरच
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला.
पाहू दे त्याला
पक्षांची अस्मान भरारी...
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...
आणि हिरव्यागार डोंगरउतारावर डोलणारी चिमुकली फुलं.

शाळेत त्याला हा धडा मिळू दे -फसवून मिळवलेल्या यशापेक्षा
सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.

आपल्या कल्पना आपले विचार
यांच्यावर दृढविश्वास ठेवायला हवा त्यानं
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी.
त्याला सांगा त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्दल घडवावी.
माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणार्‍या
भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद
त्यानं कमवायला हवी.
पुढे हेही सांगा त्याला
ऐकावं जनांचं अगदी सर्वांचं...
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्य तेव्हढं स्वीकारावं.

जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा -
हसत राहावं उरातलं दु:ख दाबून.
आणि म्हणावं त्याला,
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको.

त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला
अन् चाटुगिरीपासून सावध राहायला.
त्याला हे पुरेपुर समजवा की करावी कमाई त्यानं
ताकद आणि अक्कल विकून पण कधीही विक्रय करू नये
हृदयाचा आणि आत्म्याचा !

धिक्कार करणार्‍यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला,
आणि ठसवा त्याच्या मनावर –
जे सत्य आणि न्याय्य वाटते
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.

त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेऊ नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा
अधीर व्हायचं धैर्य,
आणि धरला पाहिजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य.
आणखीही एक सांगत राहा त्याला –
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर.

माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे,
खूप काही मागतो आहे... पण पहा..
जमेल तेव्हढं अवश्य कराच.

माझा मुलगा - भलताच गोड छोकरा आहे हो तो.

- श्री. अब्राहम लिंकन
- अनुवाद कवि श्री. वसंत बापट

कालच सकाळी मराठीच्या तासाला

कालच सकाळी मराठीच्या तासाला,
पहिल्या बाकावरील तिने
वळून पाहिले मला,
दोन्ही बाजूने कोपरखळ्या आल्या
आणि शब्द मध्येच
"मजा आहे तुझी साल्या"

मग मी ही लिहिलं एक प्रेमपत्र,
'प्रिये तुझ्या प्रीतीस होईन का ग पात्र?'

संध्याकाळी निघालो
तिच्या भेटीला,
डोळे लाऊन बसलो
तिच्या घरी जायच्या वाटेला,

एव्हढ्यात तिची सुंदर सावली
रस्त्यावर पडली
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची
प्रत्येक पाकळी थरथरली,

हृदयाचे दरवाजे लागले धडधडू,
'तिच्याशी बोलायला विषय कसा काढू?'
एव्हढ्यात एका गुंडाने तिची छेड काढली
अन् त्या गुंडाची कानफडं रंगली..

तिने धावत येऊन माझा हात धरला,
'आता स्वर्ग मला दोनच बोटे उरला'

पण क्षणातच या सुखाला
झालो मी पारखा,
कारण ती म्हणाली,
"कसा रे धावून आलास,
पाठच्या भावासारखा..."

- कवि अज्ञात.

श्रावण आला


हसरा, नाचरा,
जरासा लाजरा,
सुंदर साजिरा,
श्रावण आला

तांबुस, कोमल,
पाऊल टाकीत,
भिजल्या मातीत,
श्रावण आला

मेघांत लावीत,
सोनेरी निशाणे,
आकाशवाटेने
श्रावण आला

वार्‍याच्या संगती,
खेळत लाटांशी,
झिमझिम धारांशी,
श्रावण आला

लपत छपत,
हिरव्या रानात,
केशर शिंपित,
श्रावण आला

इंद्रधनुष्याच्या
बांधीत कमानी,
संध्येच्या गगनी,
श्रावण आला

लपे ढगामागे,
धावे माळावर,
असा खेळकर,
श्रावण आला

सृष्टीत सुखाची,
करीत पेरणी,
आनंदाचा धनी,
श्रावण आला

- कुसुमाग्रज

तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु

तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु !
तो महादेवजी पिता आपुला, चला तयाला वंदू!!

ब्राह्मण वा क्षत्रिय, चांग जरी झाला !
कसलेही रूप व रंग जरी ल्याला !
तो महार अथवा मांग सकलाला !
ही एकची आई हिंदुजाती आम्हांस, तिला वंदू!!

एकची देश हा अपुल्या प्रेमाचा!
एकची छंद जीवाच्या कवनाचा!
एकची धर्म हा आम्हा सकलांचा!
ही हिंदू जातीची गंगा, आम्ही तिचे सकल बिंदू !!

रघुवीर रामचंद्रांचा जो भक्त !
गोविन्दपदाम्बुजी जो जो अनुरक्त !
गीतेसी गाऊनी पूजी भगवंत !
तो हिंदू धर्म, नौकेत बसुनिया तरतो भवसिंधू !!

उभयांनी दोष उभयांचे खोडावे !
द्वेषासी, दुष्ट रुढीसी सोडावे!
सख्ख्यासी आईच्यासाठी जोडावे !
आम्ही अपराधांसी विसरुनी, प्रेमा पुन्हा पुन्हा सांधू!!

लेकुरे हिंदू जातीची हि आम्ही !
आमुच्या हिंदू धर्मासी त्या कामी !
प्राणही देऊनी रक्षू परिणामी !
ह्या झेंड्याखाली पूर्वजांचीया, एकाची नांदू !!

स्वातंत्र्यवीर सावरकर. रत्नागिरी - १९२५

संथ निळे हे पाणी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहरींमधूनी
शीळ घालतो वारा

दूर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपित विचारी

भरून काजव्यांनी हा
चमके पिंपळ सारा
स्तिमित होऊनी तेथे
अवचित थबके वारा

किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी

मध्येच क्षितीजावरुनी
वीज लकाकूनी जाई
अन् ध्यानस्थ गिरी ही
उघडूनी लोचन पाही

हळूच चांदणे ओले
ठिबके पानावरुनी
कसला क्षण सोनेरी
उमले प्राणामधूनी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मौनाचा गाभारा


कवी - मंगेश पाडगावकर

भंगु दे काठीन्य माझे

भंगु दे काठीन्य माझे,
आम्ल जाऊ दे मनीचे
येऊ दे वाणीत माझ्या
सुर तुझ्या आवडीचे,

राहू दे स्वातंत्र्य माझे,
फक्त उच्चारांतले गा,
अक्षरां आकार तूझ्या,
फुफ्फुसांचा वाहू दे गा.

लोभ जीभेचा जळू दे,
दे थिजू विद्वेष सारा,
द्रौपदीचे सत्त्व माझ्या
लाभू दे भाषा शरीरा.

जाऊ दे कापर्ण्य 'मी' चे,
दे धरू सर्वांस पोटी;
भावनेला येऊ दे गा
शास्त्र काट्याची कसोटी.

खांब दे ईर्ष्येस माझ्या
बाळगू तूझ्या तपाचे;
नेऊ दे तीतून माते
शब्द तूझ्या स्पंदनांचे.

धैर्य दे अन् नम्रता दे
पाहण्या जे जे पाहणे;
वाकू दे बुद्धीस माझ्या,
तप्त पोलादाप्रमाणे.

आशयाचा तूच स्वामी,
शब्दवाही मी भिकारी,
मागण्याला अंत नाही
आणि देणारा मुरारी.

काय मागावे परि म्या,
तूही कैसे काय द्यावे;
तूच देणारा जिथे अन्
तूच घेणारा स्वभावे.

- कवि बाळ सीताराम मर्ढेकर (१९०९-१९५६)

मी पणाचे कवच, अहंकार गळून पडल्याशिवाय निखळ कवितेची निर्मिति होऊ शकणार नाही
असा ह्या कवितेचा आशय आहे. ही कविता वाक्देवतेला उद्देशून आहे.

राजबन्शी


डोंगर घाटातली दाटली हिर्वी झाडी,
पिकात पायवाट गुंतली नागमोडी,
निर्मळ निर्झरांचे वाहते निळे पाणी,
रानात उजवले सोन्याचे दाणे कोणी.

ओंब्यात पीक पाणी, पिकात लाख पक्षी,
पिवळ्या पंखांवर आभाळ झालं नक्षी.
लदली आंबराई, लदल्या चिंचा भारी,
धिंगाण्या घालणार्‍या कुवार गोर्‍या पोरी.

अडाणी माणसांचे नांदते खेडे पाडे,
देवानं राजबन्शी बांधले इथे वाडे.

- ना.धो. महानोर (पानझड).

वैदर्भी बोली

वैदर्भी बोली खरेतर संस्कृतशी अधिक जवळीक असणारी. मात्र तिची खुमारी पाहायची असेल तर बुवा उपाध्यांची भगवत् गीता वाचावी. भगवत् गीतेशी एव्हढा लडिवाळपणा करण्याची हिंमत दुसर्‍या कोणत्या भाषेची वा बोलीची झाली असेल असे वाटत नाही.

बुवा लिहितात -

पार्थ म्हणे गा हृषीकेशी ।
या युद्धाची ऐशी तैशी ।
बेहेत्तर आहे मेलों उपाशी ।
पण लढणार नाहीं !

धोंडयात जावो ही लढाई ।
आपल्या बाच्यानें होणार नाही ।
समोर सारेच बेटे जावाई ।
बाप, दादे, काके ।

काखें झोळी, हातीं भोपळा ।
भीक मागून खाईन आपला ।
पण हा वाह्यातपणा कुठला ।
आपसांत लठ्ठालठ्ठी ।

या बेट्यांना नाही उद्योग ।
जमले सारे सोळभोग ।
लेकांनो ! होऊनिया रोग ।
मराना कां !

लढाई का असते सोपी ?
मारे चालते कापाकापी ।
कित्येक लेकाचे संतापी ।
मुंडकीहि छाटती ।

मग बायका बोंबलती घरी ।
डोई बोडून करिती खापरी ।
चाल चाल कृष्णा माघारीं ।
सोड पिच्छा युद्धाचा ।

अरे, आपण मेल्यावर ।
घरच्या करतील परद्बार ।
माजेल सारा वर्णसंकर ।
आहेस कोठे बाबा !

कृष्ण म्हणें, रे अर्जुना !
हा कोठला बे बायलेपणा ?
पहिल्यानें तर टणटणा ।
उडत होतास लढाया ।

मारे रथावरी बैसला ।
शंखध्वनि काय केला ।
मग आतांच कोठें गेला ।
जोर तुझा मघांचा ?

तू बेटया । मूळचाच ढीला ।
पूर्वीपासून जाणतों तुला ।
परि आता तुझ्या बापाला ।
सोडणार नाही बच्चमजी !

अहाहारे भागूबाई !
म्हणे मी लढणार नाही ।
बांगडया भरा कीं रडूबाई ।
आणि बसा दळत !

कशास जमविले आपुले बाप ?
नस्ता बिचार्‍यांसी दिला ताप ।
घरी डारडुर झोप ।
घेत पडलें असते ।

नव्हते पाहिलें मैदान ।
तोवर उगाच करी टुणटुण ।
म्हणें यँव करीन त्यँव करीन ।
आताच जिरली कशानें ?

अरे तू क्षत्रिय की धेड ? ।
आहे की विकिली कुळाची चाड ?
लेका भीक मागावयाचें वेड ।
टाळक्यांत शिरलें कोठूनी ?

अर्जुन म्हणे ‘गा’ हरी !
आतां कटकट पुरे करी ।
दहादां सांगितले तरी ।
हेका का तुझा असला ?

आपण काही लढत नाही ।
पाप कोण शिरीं घेई !
ढीला म्हण की भागूबाई ।
दे नांव वाटेल ते ।

ऐसे बोलोनि अर्जुन ।
दूर फेकूनी धनुष्यबाण ।
खेटरावाणी तोंड करून ।
मटकन्‌ खाली बैसला ।

सौजन्य - साप्ताहिक विवेक, दिवाळी अंक २००२.

गीतेच्या पहिल्या अध्यायाचे हे विडंबन कवि जयकृष्ण केशव उपाध्ये (१८८३-१९३७) यांनी केले आहे - मान्यवर यनावाला.

पिवळे, तांबुस ऊन कोवळे

पिवळे, तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर,
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दूर.

झाडांनी किती मुकुट घातले डोकीस सोनेरी,
कुरणावर शेतात पसरला गुलाल चौफेरी.

हिरवे हिरवेगार शेत हे सुंदर साळींचे,
झोके घेते कसे, चहुकडे हिरवे गालीचे.

सोनेरी, मखमली, रुपेरी पंख कितीकांचे,
रंग किती वर तर्‍हे तर्‍हेचे इंद्रधनुष्याचे.

अशी अचल फुलपाखरे, फुले साळीस जणू फुलती,
साळीवर झोपली जणू का पाळण्यात झुलती.

झुळकन् सुळकन् इकडे तिकडे किती दुसरी उडती,
हिरे, माणके, पाचू फुटूनी पंखची गरगरती.

पहा पाखरे चरोनि होती झाडावर गोळा,
कुठे बुडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा.

- भा.रा. तांबे
http://w0qa0.esnips.com/doc/e43e0086-905d-4a85-bcc2-a2ee90f304fe/पिवळे-तांबुस-उन-कोवळे-पसरे-चौफेर

कर्माबाईची खिचडी

आटपाट नगरात कर्माबाई नावाची सालस, भाविक स्त्री राहात असते. कष्ट करावेत, दुसर्‍याला आनंदी करावे, स्वत: आनंदी राहावे असा तिचा जीवन क्रम चाललेला असतो. अशी ही पराकोटीची सात्विक, सज्जन बाई रोज पहाटे उठल्याबरोबर कामाला सुरुवात करत असे. नित्यनेमाने देवाचे नामस्मरण करत असे. सर्व पहाटेची कामे उरकली की देवासाठी तांदळाची खिचडी करत असे आणि गावदेवतेला भक्तीभावाने नेऊन अर्पण करत असे. मग परत येऊन आन्हिके आटपून शेतावर कामाला जात असे.

मात्र एके दिवशी कर्माबाईकडे तिची एक लांबची नातेवाईक राहायला येते. ती सर्व हा दिनक्रम बघते आणि कर्माबाईला म्हणते, "कर्माबाई, अगं तुला काही लाजलज्जा आहे की नाही. पारोश्यानेच बनवलेली खिचडी देवाला प्रसाद म्हणून देतेस. कुठे फेडशील हे पाप?". कर्माबाई चपापते, मनाशी विचार करते, खरेच की आतापावेतो आपल्या लक्षातच आले नव्हते. नकळत का होईना आपल्याकडून आगळिक घडली म्हणायची.

मग ती दुसर्‍या दिवशीपासून आपला दिनक्रम बदलते. अंघोळ करून, नीट वेणी फणी करून, खिचडी बनवून देवाला न्यायला लागते. असे काही दिवस जातात. हा नवीन दिनक्रम कर्माबाईच्या अंगवळणी पडतो.

पण एके दिवशी कर्माबाईच्या स्वप्नात एक नितळ, नितांतसुंदर पुरुष येतो आणि कर्माबाईला प्रेमाने म्हणतो, "कर्मे ! मला नाही का ओळखलेस? अगं मी तोच देव ज्याचे तू नामस्मरण करतेस, ज्याला रोज खिचडीचा नैवेद्य दाखवतेस".

साक्षात् परमेश्वराचे दर्शन घडल्याने कर्माबाईला धन्य धन्य होते. ती संकोचाने विचारते, "देवा आज माझ्या स्वप्नात कसे काय येणे केले?". देव म्हणतो, "कर्मे, अगं मला तांदुळ - मुगाच्या डाळीची खिचडी अतिशय आवडते आणि अशी खिचडी खायला घालणारे भक्त तर त्याहून जास्त आवडतात" (* नोंद घ्यावी) आणि तू खिचडी बनवतेस पण छान. मात्र आताशा मला तुझ्या खिचडीसाठी खूप वाट पाहावी लागते. त्यापेक्षा तू पहाटे पहाटे पारोश्यानेच खिचडी आणत होतीस तेच किती चांगले होते. उद्या पासून मला तांबडे फुटल्याबरोबर तुझ्या हातची पारोश्यानेच केलेली खिचडी हवी.

अशी ही पाचा उत्तरी कहाणी साठा उत्तरी सुफळ संपूर्ण.

कथाबीज स्रोत - शांताबाई शेळके.

* माँ मृदुलानंदमयींना पण तांदुळ - मुगाच्या डाळीची खिचडी अतिशय आवडते आणि अशी खिचडी खायला घालणारे भक्त तर त्याहून जास्त आवडतात. कळावें, लोभ असावा ही विनंती.