Friday 15 June 2012

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती
आचार्यांचे आशीर्वाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी

- वि. म. कुलकर्णी ...

2 comments:

  1. Khupach sundar sangrah aahe. Helpful to marathi lovers.

    ReplyDelete
  2. मराठी म्हणजे झुळझुळ वाहणारे पाणी
    ज्यामुळे फुलतो आनंद आपल्या जीवनी
    सौंदर्य वाडःमय माझ्या मायमराठीचे ठायी
    अद्भुत आनंदाची आहे जणू पर्वणी
    अद्भुत अविष्कार अद्भुत हीचे लेणे
    शब्द सामर्थ्याचे नेहमीच गाते तराणे

    ReplyDelete