Friday, 15 June 2012

आमच्या नशीबाची चाल...
आमच्या नशीबाची चाल... बुद्धिबळातल्या उंटासारखी... तिरकी. लोकांची सरळ चालणारी नशीबं पाहिली की मला त्यांचा हेवा वाटतो. ठरलेल्या रूळावरून जाणार्‍या ट्राम गाडी सारखी ही ६ नंबर, ७ नंबर ची माणसं आयुष्याचा प्रवास थोड्याश्या मंदगती करत असतील पण संसाराच्या शेवटी इष्टस्थळी जाऊन पोहोचतात. रितसर रिटायर होतात, पुण्याला घर बांधतात, त्यांना दोन मुलगे आणि एकच मुलगी अशी 'बेतशुद्ध' संतती असते. त्यातला एक इंजिनीयर होतो, दुसरा डॉक्टर होतो, मुलगी प्रेमविवाह करून बापाला हुंड्याच्या रकमेतून वाचवते, जावई देखील सद्गुणी असतो, असल्या लोकांना कॅज्युअल लिव्ह सुद्धा रविवारला जोडून मिळते, ह्यांच्या घरचे दुधवाले दुधात पाणी घालत नाहीत, रामा गडी गौरी गणपतीला कोकणात गेले तरी पाचव्या दिवशी परततात. आमचा रामा गौरीला म्हणून जो जातो तो शिमगा झाला तरी बेपत्ता.

- असा मी असामी

- पु.ल. देशपांडे.


थांब उद्याचे माऊली


पोरसवदा होतीस
कालपरवा पावेतो;
होता पायांतही वारा
कालपरवा पावेतो.
आज टपोरले पोट
जैशी मोगरीची कळी;
पडे कुशीतून पायीं
छोट्या जीवाची साखळी.
पोरसवदा होतीस
कालपरवा पावेतो;
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायाचे घेईतों!


-बा. सी. मर्ढेकर

कविता सौजन्य - http://kavitaapaanopaanii.blogspot.in/2010/04/blog-post.html

चित्र सौजन्य - esakal.com

वाकून टाक सडावाकून टाक सडा,
गं राधे जरा, वाकून टाक सडा ।। धृ ।।

केस कुरळे उडतील भुरूभुरू,
आवळून बांध बुचडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।१।।

शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील,
पदर खोच कमरेला, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।२।।

गावातील लोक टकमक बघतील,
थुंकून टाक विडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।३।।

एका जनार्दनी पूर्ण कृपेने,
श्रीरंग माझा वेडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।४।।

इथे ऐका ही गवळण - http://www.loksangeet.com/marathimusic/details.php?image_id=1438

माझ्या मराठीची गोडी

माझ्या मराठीची गोडी
मला वाटते अवीट
माझ्या मराठीचा छंद
मना नित्य मोहवित

ज्ञानोबांची तुकयाची
मुक्तेशाची जनाईची
माझी मराठी गोडी
रामदास शिवाजीची

'या रे, या रे अवघे जण,
हाक मायमराठीची
बंध खळाळा गळाले
साक्ष भीमेच्या पाण्याची

डफ तुणतुणे घेऊन
उभी शाहीर मंडळी
मुजर्‍याची मानकरी
वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ
अभंगाच्या तालावर
कोवळीक विसावली
पहाटेच्या जात्यावर

हिचे स्वरुप देखणे
हिची चाल तडफेची
हिच्या नेत्री प्रभा दाटे
सात्विकाची, कांचनाची

कृष्णा गोदा सिंधुजळ
हिची वाढवती कांती
आचार्यांचे आशीर्वाद
हिच्या मुखी वेद होती

माझ्या मराठीची थोरी
नित्य नवे रुप दावी
अवनत होई माथा
मुखी उमटते ओवी

- वि. म. कुलकर्णी ...

Thursday, 14 June 2012

जलदालीथबथबली, ओथंबुनि आली खाली,
जलदाली मज दिसली सायंकाली.
रंगही ते नच येती वर्णायातें !
सुंदरता मम त्यांची भुलवी चित्ता.
व्योमपटीं जलदांची झाली दाटी;
कृष्ण कुणी काजळिच्या शिखरावाणी,
नील कुणी इन्द्रमण्यांच्या कान्तिहुनि,
गोकर्णी मिश्र जांभळे तसे कुणी;
तेजांत धूमाचे उठती झोत,
चकमकती पांडुरही त्या परिस किती !
जणुं ठेवी माल भरूनी वर्षादेवी.
आणुनिया दिगंतराहुनि या ठाया !
कोठारी या वरला दिसतो न परी.
पाहुनि तें मग मारुत शिरतो तेथे;
न्याहळुनी नाहिं बघत दुसरें कोणी
मग हातें अस्ताव्यस्त करी त्यातें.
मधु मोतीं भूवरतीं भरभर ओती !
(अपूर्ण)


- त्र्यंबक बापुजी ठोंबरे (बालकवि)
जन्म - १३ ऑगस्ट १८९०.

मामाची गाडी

माझ्या मामाची रंगीत गाडी हो,
तिला खिल्लार्‍या बैलांची जोडी हो.

कशी दौडत दौडत येई हो,
मला आजोळी घेऊन जाई हो,
नाही बिकट घाट,
सारी सपाट वाट,
मऊ गालीचे ठायी ठायी हो.

शीळ घालून मंजूळ वाणी हो,
पाजी बैलांना ओहोळ पाणी हो,
गळा खुळखुळ घुंगुर माळा हो,
गाई किलबिल विहंग मेळा हो,
बाजरीच्या शेतात,
करी सळसळ वात,
कशी घुमली अंबेराई हो.

कोण कानोसा घेऊन पाही हो,
कोण लगबग धावून येई हो,
गहिवरून धरून पोटी हो,
माझे आजोबा चुंबन घेती हो,
लेक एकुलती,
नातू एकुलता,
किती कौतुक कौतुक होई हो.

- ग. ह. पाटील

कविता सौजन्य - http://sachinpednekar.wordpress.com/2009/11/02/मामाची-गाडी/

लिलाव

 
उभा दारी कर लावूनी कपाळा
दीन शेतकरी दाबूनी उमाळा,
दूत दाराशी पुकारी लिलाव,
शब्द कसले ते - घणाचेच घाव !

पोसलेले प्राशून रक्त दाणे
उडूनि जाती क्षणी पाखरांप्रमाणे
निघत मागुनि बाजले आणि थाळी,
गाडग्यांची पाळी !

वस्तु वस्तुंवर घालुनिया धाड
करित घटकेतच झोपडे उजाड !
स्तब्ध बाजूला बसे घरधणीन लाल
डोळ्यांतिल आटले उधाण;

भुके अर्भक अन् कवळूनी उरास,
पदर टाकूनी त्या घेई पाजण्यास
ऊर उघडे ते तिचे न्याहळोनी
थोर थैलीतिल वाजवीत नाणी -

"आणि ही रे!" पुसतसे सावकार,
उडे हास्याचा चहुकडे विखार!

- कुसुमाग्रज - नाशिक - १९३४.

आसुसलेला शेवगा


दोन प्रहर, निवान्त सारे
श्रमभाराने बाजेवरती
पांगुळलेली तू.
खिडकीबाहेर ढाळितो चवरी
आसुसलेला शेवगा दारचा

- कविवर्य पु. शि. रेगे

रेग्यांच्या कवितेतील स्त्री ही ‘उपभोगाचा’ विषय म्हणून येते, असा आक्षेप त्यांच्या कवितेवर घेतला गेला. पण रेग्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे ती स्त्री-शरीराचे वर्णन करताना त्यात गुंतून पडत नाही. प्रेम, आसक्ती, अनासक्ती व तटस्थ अशा वळणाने तिचा प्रवास चालू राहतो. या दृष्टीने ‘शेवगा’ ही कविता त्यांच्या प्रेमाचे वैशिष्ट्य स्पष्ट करते.

दुपारच्या वेळी सगळे निवांत असताना पत्नीकडे वैषयिक भावनेने पाहणारा पुरुष ती दमलेली आहे, हे लक्षात घेऊन श्रमभार कमी व्हावा, या भावनेने तिच्यासाठी चवरी ढाळू लागतो. ही संपूर्ण कविता म्हणजे त्यांच्या कवितेचा स्वभाव म्हणावा लागेल. स्त्री-विषयक आसक्ती, शृंगार भावना ही तिची मूळ प्रेरणा, पण ती दमलेली, श्रमलेली आहे. या जाणिवेने त्याच्यातील शृंगाराची भावना ही तटस्थतेत बदलते. ही तटस्थता निर्विकारपणातून आलेले नसून तिच्यावरच्या प्रेमातून, समंजसपणातून आलेले आहे. शरीरसंवेदना या त्यांच्या प्रेमभावनेचा विशेष असला तरी ती तिथेच थांबत नाही, ती शरीरातीत पातळीवर जाते. मनापासून शरीराकडे आणि त्याही पुढे जाऊन शरीरातीत आत्मिक असा तिचा प्रवास असतो. दैहिक जाणिवेपलीकडे जाऊन सौंदर्याचा अनुभव देणारी व घेणारी स्त्री त्यांच्या कवितेतून दिसते.

- डॉ. वैखरी वैद्य

The source link - http://www.loksatta.com/daily/20090801/ch12.htm

बालमित्रास

आठवते ना-
ओढ्याकाठी अपुल्या घरची
गाय घेउनी धावत होतो
चरावयाला सोडुनिया तिज
पारंब्यावर लोंबत होतो!

आठवते ना-
डोहामधले स्वैर डुंबणे
अंगावरचे ओले कपडे
अंगावरती तसेच सुकणे,
सुकता कपडे पुन्हा पोहणे...

आठवते ना-
करवंदीचा चीक बिलगता
बोटे अपुली बसली चिकटुन
अन कैर्‍याच्या दिवसांमध्ये
हातकातडी गेली सोलुन!

आठवते ना-
हातामध्ये हात घालुनी
अर्धा डोंगर गेलो चढुनी
वर्गामधल्या गोष्टी बोलत
उन्हात फिरलो शेतांमधुनी

मला तरी नित आठवते गा
आठवते ते फुलते जीवन
आक्रसलेल्या चाळिमध्ये
उबगुनी जाता देह आणि मन

- वि. म. कुलकर्णी

निवडुंगाच्या शीर्ण फुलांचेनिवडुंगाच्या शीर्ण फुलांचे
झुबे लालसर ल्यावे कानी,
जरा शिरावे पदर खोवुनी
करवंदीच्या जाळीमधूनी.

शीळ खोल ये तळरानातून
भण भण वारा चढणीवरचा,
गालापाशी झिळमिळ लाडिक,
स्वाद जिभेवर आंबट कच्चा.

नव्हती जाणीव आणि कुणाची,
नव्हते स्वप्नही कुणी असावे,
डोंगर चढणीवरी एकटे
किती फिरावे, उभे रहावे.

पुन्हा कधी न का मिळायचे ते,
ते माझेपण, आपले आपण,
झुरते तनमन त्याच्यासाठी
उरते पदरी तीच आठवण...

निवडुंगाच्या शीर्ण फुलांची,
टपोर हिरव्या करवंदाची…

- इंदिरा संत

Tuesday, 14 February 2012

सूर्यदेवपूर्वेच्या देवा, तुझे सूर्यदेव नाव
प्रभातीस येशी सारा जागवीत गाव ||

विधाता जगाचा तूची उधळीत आशा
उजळीशी येता येता सभोवती जग, दिशा
रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव ||

अंधारास प्रभा तुझी मिळे प्रभाकर
दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर
सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव ||

पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस
तूच चालूनिया येशी माझिया घरास
भक्ताठायी गुंतला रे तुझा भक्तिभाव ||

स्वर - रामदास कामत
गीत - गंगाधर महांबरे

सौजन्य - http://www.maayboli.com/node/23135

चिंतातुर जंतू"निजले जग; का आता इतक्या तारा खिळल्या गगनाला |
काय म्हणावे त्या देवाला – "वर जाउनि म्हण जा त्याला" || १ ||

"तेज रवीचे फुकट सांडते उजाड माळावर उघड्या |
उधळणूक ती बघवत नाही " "डोळे फोडुनि घेच गड्या" || २ ||

"हिरवी पाने उगाच केली झाडांवर इतकी का ही |
मातित त्यांचे काय होतसे?" "मातिस मिळुनी जा पाहीं!" || ३ ||

"पुराबरोबर फुकटावारी पाणी हे वाहुनि जात |
काय करावे जीव तळमळे" "उडी टाक त्या पूरात" || ४ ||

"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी जास्त" || ५ ||

देवा, तो विश्वसंसार राहू द्या राहिला तरी |
ह्या चिंतातुर जंतूंना एकदा मुक्ति द्या परी ! || ६ ||


- गोविन्दाग्रज (कवि रा. ग. गडकरी).

घरतृप्त स्वतंत्र गोव्यात केव्हातरी केव्हातरी
फेसाळल्या लाटांपाशी सिंधुसरितेच्या तीरी।
बांधीन मी छोटेसेच लाल चिरेबंदी घर
गार विलायती वेल चढवीन भिंतीवर॥

मागे विहीर काठाची वर प्राजक्ताचे खोड
गर्द हिरवे न्हाणीशी नीरफणसाचे झाड।
केळबनाच्या कडेला स्वच्छ छोटासाच गोठा
त्यात सवत्स कपिला ओल्या चार्‍याचा नि साठा॥

फुलपाखरांच्यासाठी पुढे फुलझाडे चार।
आंबा एकादा कलमी यावी म्हणुनिया खार।
गारव्याच्यासाठी काही गार नाजूक पोफळी
नागमोडी त्यांच्यावर पानवेल मिरवेल॥

वर पश्चिमेला गच्ची अभ्यासिका पूर्वेकडे
शेजारच्या माडावर पाहीन मी सोनसडे।
कानी समुद्राची गाज पुढे ग्रंथ स्वर्णाक्षरी
पारव्यांची कुजबुज खिडकीच्या गजांवरी॥

असा पहाटेला घेत हुक्क्या चहाची लज्जत
लिहीन मी भावगीते तेथे घुमत घुमत।
आणि येता थोडा शीण बसुनिया गच्चीवर
रेखाटीन भोवतीचे चित्र एखादे सुंदर॥

जाळी फेकणारे कोळी, त्यांच्या मासळीच्या होड्या
खपणारे वावराडी, त्यांच्या विसाव्याच्या विड्या।
कधी काजळता क्रूस कधी उजळ घुमट
बांगड्यांशी खेळणारा कधी ओलेतीचा घट॥

आणि मग सेवीन मी जाईजुईचा गे भात
पोईतल्या मासळीचा स्वाद घेत साथ साथ।
वेताचिया खाटेवर थोडा बागेत दुपारी
झोपेन मी घोळवीत तुझी अमली सुपारी॥

आणि सूर्यास्तास माझा रंगी घेऊन शिकारा
तुझ्यासंगे जाईन मी इंद्रचंद्राच्या माहेरा।
कुणी भविष्याचा कवी आम्हा ऐकवील गाणी
ऐकेन ती समाधाने डोळा घेऊनीया पाणी॥

थंडीवार्‍यात पश्मिनी शाल स्कंधी घालशील
काठी उद्याचा तो कवी प्रेमे मला सांभाळील।
घरी येताच नातरे आनंदाने म्हणतील
सांगा गोष्ट किंवा म्हणा नवे गाणे॥

रचुनिया सांगेन मी त्यांना गाण्यातच कथा
जेणे जाणवेल त्यांना उद्या दुसर्‍याची व्यथा।
मग रेलून गच्चीत टक लावीन आकाशी
दाट काळोखातही मी चिंब भिजेन प्रकाशी॥

असे माझे गोड घर केव्हातरी केव्हातरी
अक्षरांच्या वाटेनेच उतरेल भुईवरी॥

: संकलक - धनंजय

Thanks to http://ek-kavita.blogspot.com/2011/07/blog-post.html

दु:खदु:ख नको टिचभर हृदयाचे,
दु:ख नको ओंजळभर प्रीतीचे,
दु:ख नको भिंतीतच उबणारे,
दु:ख नको खुजट, कुबट छपरातच दबणारे,
दु:ख असे द्या विशाल, येईल जे निजकवेत,
क्षितिजासह हे वर्तुळ

- पद्मा.
कविता शीर्षक - दु:ख हवे. कविता संग्रह - स्वप्नजा.

खळी


स्वर्गामधूनी येता बालक,
अमृत त्याचे काढून घेती,
उरे रिकामी वाटी जवळी,
ती खळी ही गालावरती!
 - विं. दा. करंदीकर

Saturday, 11 February 2012

सांगावा

किती धाडला सांगावा:
मला येऊनिया न्यावे;
चोळमोळा झाला जीव,
किती त्याला शिणवावे!

किती पाहिली मी वाट
असे सांगावे धाडून;
केली कितीदा तयारी,
सारे काही आवरून

अंगणात संमार्जन,
दारा सतेज तोरण,
सारविल्या भुईवरी
स्वस्तिकाचे रेखाटण;

चूलबोळकी, बाहुल्या
दडपिल्या पेटार्‍यांत;
लख्ख लख्ख सारे काही
निघायच्या तयारीत.

कसा नसेल पोचला
एक सांगावा येथून?
कसे नसेल ठाऊक
इथे मोजते मी क्षण?

दक्षिणेच्या झंझावाता,
कधी येणार धावत?
माझे मातीचे हे घर
कधी घेणार मिठीत?

- इंदिरा संत

ऋण

ऋण


तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात ॥ १ ॥

नाही राजा ओढवत
चार पाउले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर ॥ २ ॥

माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारु शिवी ॥ ३ ॥

माझा घालावाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ ॥ ४ ॥

अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत ॥ ५ ॥

मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे ॥ ६ ॥

- श्री. दि. इनामदार

अनंताचे फूल

अनंताचे फूल

- धामणस्कर


तुझ्या केसात
अनंताचे फूल आहे म्हणजे
तुझ्या ही अंगणात अनंताचे
झाड आहे, ह्या जाणिवेने मी
मोहरुन जातो.

नावगाव माहीत नसताना ही तुझे,
आपल्यात एक तरल संबंध रुजून
आलेला मी पाहतो...

कढई


ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट.

मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडूनि तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकूनि पक्के, काळे, बळकट.

फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतून कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.

- बा.सी. मर्ढेकर.

केस कुरळे


सोडूनी घनदाट सुंदर केस कुरळे,
ही वनश्री दूर आकाश न्याहाळे,
एक पक्षी दूर गिरकी वेळताना,
मोकळ्या केसांत नक्षी गुंफताना

- ना. धों.