Tuesday, 14 February 2012

खळी


स्वर्गामधूनी येता बालक,
अमृत त्याचे काढून घेती,
उरे रिकामी वाटी जवळी,
ती खळी ही गालावरती!
 - विं. दा. करंदीकर

Saturday, 11 February 2012

सांगावा

किती धाडला सांगावा:
मला येऊनिया न्यावे;
चोळमोळा झाला जीव,
किती त्याला शिणवावे!

किती पाहिली मी वाट
असे सांगावे धाडून;
केली कितीदा तयारी,
सारे काही आवरून

अंगणात संमार्जन,
दारा सतेज तोरण,
सारविल्या भुईवरी
स्वस्तिकाचे रेखाटण;

चूलबोळकी, बाहुल्या
दडपिल्या पेटार्‍यांत;
लख्ख लख्ख सारे काही
निघायच्या तयारीत.

कसा नसेल पोचला
एक सांगावा येथून?
कसे नसेल ठाऊक
इथे मोजते मी क्षण?

दक्षिणेच्या झंझावाता,
कधी येणार धावत?
माझे मातीचे हे घर
कधी घेणार मिठीत?

- इंदिरा संत

ऋण

ऋण


तुझ्या शेतात राबून
माझी सरली हयात
नको करू हेटाळणी
आता उतार वयात ॥ १ ॥

नाही राजा ओढवत
चार पाउले नांगर
नको बोलूस वंगाळ
नको म्हणूस डंगर ॥ २ ॥

माझ्या ऐन उमेदीत
माझी गाईलीस ओवी
नको चाबकासारखी
आता फटकारु शिवी ॥ ३ ॥

माझा घालावाया शीण
तेव्हा चारलास गूळ
कधी घातलीस झूल
कधी घातलीस माळ ॥ ४ ॥

अशा गोड आठवणी
त्यांचे करीत रवंथ
मला मरण येऊ दे
तुझे कुशल चिंतीत ॥ ५ ॥

मेल्यावर तुझे ठायी
पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या कातड्याचे जोडे
तुझ्या पायात वाजू दे ॥ ६ ॥

- श्री. दि. इनामदार

अनंताचे फूल

अनंताचे फूल

- धामणस्कर


तुझ्या केसात
अनंताचे फूल आहे म्हणजे
तुझ्या ही अंगणात अनंताचे
झाड आहे, ह्या जाणिवेने मी
मोहरुन जातो.

नावगाव माहीत नसताना ही तुझे,
आपल्यात एक तरल संबंध रुजून
आलेला मी पाहतो...

कढई


ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट.

मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडूनि तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकूनि पक्के, काळे, बळकट.

फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतून कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.

- बा.सी. मर्ढेकर.

केस कुरळे


सोडूनी घनदाट सुंदर केस कुरळे,
ही वनश्री दूर आकाश न्याहाळे,
एक पक्षी दूर गिरकी वेळताना,
मोकळ्या केसांत नक्षी गुंफताना

- ना. धों.

Friday, 25 March 2011

नाही पाहेली पुनिव


आमी जलमलो मातीत
किती होनार गा माती,
खापराच्या दिव्यात
या कधी पेटनार वाती.

किती घरातून सूर्य
जातं होऊन फिरते,
पिठासारख्या उजिळ
घरभर पसरते.
काया म्हसीवानी रात
नित आमच्या दारात,
निर्‍हा अंधार भरली,
बसे पखाल रिचोत.
नाही पाहेली पुनिव,
लय आईकल्या गोठी,
आमी जलमलो ....

फास लावून जल्लद,
चाले कोनाचा वखर,
खाली ढेकलाच्या वानी,
आमी होतो चुरचूर.
फुलवल्या कापसाले
चंद्र चोरू चोरू पाहे,
तरी माय मावलीची
मांडी उघळीच राहे.
ऊभं अभाय फाटलं,
कसी झाकनार छाती,
आमी जलमलो ....

दाने भरता कन्सात
येती हुशार पाखरं,
भर हंगामात अशा
होते पारखी भाकर.
तहा पोटातली आग
पेट घेते आंगभर,
मंग सोंगेल फनाची
अनी होते धारदार.

कोनं सांगाव रगत
तिले लागनार किती,
खापराच्या दिव्यातून
मंग पेटतील वाती,
आमी जलमलो ....

- कवि विठ्ठल वाघ (काया मातीत मातीत).