Saturday, 11 February 2012
कढई
ह्या दु:खाच्या कढईची गा
अशीच देवा घडण असू दे;
जळून गेल्या लोखंडातहि
जळण्याची, पण पुन्हा ठसू दे
कणखर शक्ती, ताकद जळकट.
मोलाची पण मलूल भक्ति
जशि कुंतीच्या लिहिली भाळी,
खिळे पाडूनि तिचे जरा ह्या
कढईच्या दे कुट्ट कपाळी
ठोकूनि पक्के, काळे, बळकट.
फुटेल उकळी, जमेल फेस,
उडून जाइल जीवन-वाफ;
तरि सांध्यांतून कढईच्या ह्या
फक्त बसावा थोडा कैफ
तव नामाचा भेसुर धुरकट.
- बा.सी. मर्ढेकर.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment