दोन प्रहर, निवान्त सारे
श्रमभाराने बाजेवरती
पांगुळलेली तू.
खिडकीबाहेर ढाळितो चवरी
आसुसलेला शेवगा दारचा
- कविवर्य पु. शि. रेगे
रेग्यांच्या कवितेतील स्त्री ही ‘उपभोगाचा’ विषय म्हणून येते, असा आक्षेप त्यांच्या कवितेवर घेतला गेला. पण रेग्यांच्या कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे ती स्त्री-शरीराचे वर्णन करताना त्यात गुंतून पडत नाही. प्रेम, आसक्ती, अनासक्ती व तटस्थ अशा वळणाने तिचा प्रवास चालू राहतो. या दृष्टीने ‘शेवगा’ ही कविता त्यांच्या प्रेमाचे वैशिष्ट्य स्पष्ट करते.
दुपारच्या वेळी सगळे निवांत असताना पत्नीकडे वैषयिक भावनेने पाहणारा पुरुष ती दमलेली आहे, हे लक्षात घेऊन श्रमभार कमी व्हावा, या भावनेने तिच्यासाठी चवरी ढाळू लागतो. ही संपूर्ण कविता म्हणजे त्यांच्या कवितेचा स्वभाव म्हणावा लागेल. स्त्री-विषयक आसक्ती, शृंगार भावना ही तिची मूळ प्रेरणा, पण ती दमलेली, श्रमलेली आहे. या जाणिवेने त्याच्यातील शृंगाराची भावना ही तटस्थतेत बदलते. ही तटस्थता निर्विकारपणातून आलेले नसून तिच्यावरच्या प्रेमातून, समंजसपणातून आलेले आहे. शरीरसंवेदना या त्यांच्या प्रेमभावनेचा विशेष असला तरी ती तिथेच थांबत नाही, ती शरीरातीत पातळीवर जाते. मनापासून शरीराकडे आणि त्याही पुढे जाऊन शरीरातीत आत्मिक असा तिचा प्रवास असतो. दैहिक जाणिवेपलीकडे जाऊन सौंदर्याचा अनुभव देणारी व घेणारी स्त्री त्यांच्या कवितेतून दिसते.
- डॉ. वैखरी वैद्य
The source link - http://www.loksatta.com/
No comments:
Post a Comment