Thursday, 14 June 2012

बालमित्रास

आठवते ना-
ओढ्याकाठी अपुल्या घरची
गाय घेउनी धावत होतो
चरावयाला सोडुनिया तिज
पारंब्यावर लोंबत होतो!

आठवते ना-
डोहामधले स्वैर डुंबणे
अंगावरचे ओले कपडे
अंगावरती तसेच सुकणे,
सुकता कपडे पुन्हा पोहणे...

आठवते ना-
करवंदीचा चीक बिलगता
बोटे अपुली बसली चिकटुन
अन कैर्‍याच्या दिवसांमध्ये
हातकातडी गेली सोलुन!

आठवते ना-
हातामध्ये हात घालुनी
अर्धा डोंगर गेलो चढुनी
वर्गामधल्या गोष्टी बोलत
उन्हात फिरलो शेतांमधुनी

मला तरी नित आठवते गा
आठवते ते फुलते जीवन
आक्रसलेल्या चाळिमध्ये
उबगुनी जाता देह आणि मन

- वि. म. कुलकर्णी

No comments:

Post a Comment