आईच्या दु:खांचे डोळाभर पाणी,
दाटली कहाणी आयुष्याची.
शेवटी मनीचे सांगणे राहिले,
हुंदक्यांनी मुके पंचप्राण.
गलबला सोसले सोडताना घर,
माझे महाद्वार ओस झाले.
आमुच्या संसारी घोटाळो न मन,
तिथे तरी प्राण शांत राहो.
जात्याच्या ओवीचा संपला वेदान्त,
देव्हार्यात वात करपली.
-- ना. धों. महानोर.
Tuesday, 22 February 2011
डराव डराव!
डराव डराव! डराव डराव!
का ओरडता उगाच राव?
पत्ता तुमचा नव्ह्ता काल,
कोठुनी आला? सांगा नाव,
धो धो पाउस पडला फार,
तुडुंब भरला पहा तलाव,
सुरू जाहली अमुची नाव
आणिक तुमची डराव डराव!
बटबटीत डोळ्यांचे ध्यान,
विचित्र तुमचे दिसते राव!
सांगा तुमच्या मनात काय?
ही घ्या छत्री, ही घ्या नाव,
जा गाठा जा अपुला गाव
आणि थांबवा डराव डराव!
- ग. ह. पाटिल
मर्हाटी भाषेचे महात्म्य !
मर्हाटी भाषेचे महात्म्य !
आतां सुमन देतु अवधान । धुमकुसें साहित्याचेन ।
जग भोजें नाचवीन । आनंदाचा ।।
आधींचि जगा चंदन आवडे । वरि देवाचें अनुलेपन जोडे ।
तरि कवणां वालभ न पडे । तया सुखाचें ? ।।
तैसें आइकतां श्रीकृष्णचरित्र । होय सकळ सुखाचें छेत्र ।
वरि जोडे ब्रह्मसुख पवित्र । ते मर्हाटी बोलैन ।।
जिये भाषेचिये रसवृत्ती । सा भाषांचे कुपे कीजेति निगुती ।
ते मर्हाटी कवण जाणे निरूती । जे रसांचे जीवन ।।
ते मर्हाटी बोल रसिक । वरि दावीन देशियेचे बिक ।
म्हणैन सव्याखान श्लोक । मिसें वोवियेचेनि ।।
- कवि नरेंद्र, रुक्मिणी स्वयंवर, रचनाकाल शके १२१३-१४.
सध्या शके १९३२ चालू आहे.
सा भाषा - संस्कृत, प्राकृत, अपभ्रंश, पैशाची, मागधी व शौरसेनी ह्या सहा भाषा.
पैशाची ही प्राचीन भारतात बोलली जाणारी प्राकृत भाषा असून ती सध्या मृत भाषा गणली जाते.
ही पिशाच्चांची भाषा असल्याची आख्यायिका वाचायला मिळते तरी यात फारसे तथ्य नसून बहुधा ही भाषा आदिवासी व राना-वनातील जमातींची बोली भाषा असावी असा तज्ज्ञांचा कया...स आहे.
गुणाढ्याचा बृहत् कथा हा ग्रंथ पैशाची भाषेत लिहिलेला होता.
* पैशाची भाषा
पैशाची भाषा: ऊन, तहान, कान, रान, मराठी भाषा: उष्ण, तृष्णा,कर्ण,अरण्य पैशाची भाषेतील वरील शब्द आजही मराठीत दिसतात. पैशाची आणि काही प्राकृत भाषेत 'ण' नाही.
पैशाची भाषा उस प्राकृत भाषा का नाम है जो प्राचीन काल में भारत के पश्चिमोत्तर प्रदेश में प्रचलित थी। पश्तो तथा उसके समीपवर्ती दरद भाषाएँ पैशाची से उत्पन्न एवं प्रभावित हुई पाई जाती हैं।
मादक दरवळ
मोहाच्या मादक फुलांचा,
मादक दरवळ दाट,
अंधुक थोडी पहाट पिवळी,
अंधुक थोडा घाट.
फुले वेचता चुनरीवरती,
तिच्या मृदुल डोळ्यांना,
थोड्या उघड्या गोंदण गोर्या,
झाकत अंगांगाना.
तिचा चुनीचा लाल घागरा,
लपझप थोडी घाई,
मोहाच्या फांदीत अडकला
- लाख जरी चतुराई.
- ना. धों. महानोर (पानझड)
शब्द
आज माझा प्रत्येक शब्द आभाळ झालाय.
मी सडून होतो - पडून होतो - कुढून होतो
इतक्यांदि अर्थच नव्हता माझ्या शब्दाला.
माझा शब्द : एक गोणपाट
कोनाड्यात पडलेले
पडलेच उपयोगी तर कधीमधी
घर पुसायला किंवा पोचारा.
मला ठाऊकच नव्हते शब्दांचे आभाळपण
कारण तुम्ही शब्दांनाच बांधले दावणीला
कसे सांगू तुम्हांला शब्दावाचून दिन सुने
जाताना काळजाचे कसे कोळसे झाले ते.
कळणार नाही माझ्या बाबांनो
हा तळहातावर जपलेला
पाळण्यात जोजावलेला
साता समिंद्राच्या पल्ल्याडला माझा शब्द -
शब्द नाहीयच तो लहलहणारा जळजळीत लाव्हा
जर उच्चारलाच नाही तो तर त्वचेलाही फुटतील
शब्दांचे धुमारे !
आज चौखुर उधळलेला माझा शब्द -
कसे सांगू तुम्हांला आज माझा प्रत्येक शब्द
आभाळ झालाय !
- अरुण कृष्णाजी कांबळे.
कवीला जाणवलेले शब्दांचे सामर्थ्य हा ह्या कवितेचा आशय आहे
[कुमारभारती - १० (इ.स. १९९०)].
सोडा पंढरपूर, जगासाठी
विटेवरी देवा, युगे झाली फार
सोडा पंढरपूर, जगासाठी
किती यावे जावे, तुझ्या दारापाशी
उपाशी तापाशी, आषाढीला
कितीक सांगावी, दुष्टांची गार्हाणी
सज्जनां कारणी, कोणी नाही
अमंगळ सारे, पोसले जातांना
तुझा मुकेपणा, जीवघेणा
नाही सोसवत, आम्हा हे पाहाणे
सुकृताला जिणे, फासासाठी
सत्य असत्याचे, तुझे निरुपण
ऐकतांना शीण, आला देवा
आम्हा ठावे आहे, तुझे डोळेपण
राऊळ सोडोन, पाहा तरी
वैष्णवांचा धर्म, विश्वाकार थोर
सांगा दारोदार, पांडूरंगा.
- ना. धो. महानोर.
सोडा पंढरपूर, जगासाठी
किती यावे जावे, तुझ्या दारापाशी
उपाशी तापाशी, आषाढीला
कितीक सांगावी, दुष्टांची गार्हाणी
सज्जनां कारणी, कोणी नाही
अमंगळ सारे, पोसले जातांना
तुझा मुकेपणा, जीवघेणा
नाही सोसवत, आम्हा हे पाहाणे
सुकृताला जिणे, फासासाठी
सत्य असत्याचे, तुझे निरुपण
ऐकतांना शीण, आला देवा
आम्हा ठावे आहे, तुझे डोळेपण
राऊळ सोडोन, पाहा तरी
वैष्णवांचा धर्म, विश्वाकार थोर
सांगा दारोदार, पांडूरंगा.
- ना. धो. महानोर.
आली कापनी कापनी
आता लागे मार्गेसर,
आली कापनी कापनी,
आज करे खालेवर्हे,
डाव्या डोयाची पापनी !
पडे जमीनीले तढे,
आली कापनी कापनी,
तशी माझ्या डोयापुढे
उभी दान्याची मापनी.
शेत पिवये धम्मक,
आली कापनी कापनी,
आता धरा रे हिंमत,
इय्ये ठेवा पाजवूनी.
पिकं पिवये पिवये,
आली कापनी कापनी,
हातामधी धरा इय्ये,
खाले ठेवा रे गोफनी.
काप काप माझ्या इय्या,
आली कापनी कापनी,
थाप लागली पीकाची,
आली डोयाले झापनी !
आली पुढे रगडनी,
आता कापनी कापनी,
खये करा रे तय्यार,
हाती घीसन चोपनी.
माझी कापनी कापनी,
देवा तुझी रे मापनी,
माझ्या दैवाची करनी,
माझ्या जीवाची भरनी.
- बहिणाबाई चौधरी.
Subscribe to:
Posts (Atom)