संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहरींमधूनी
शीळ घालतो वारा
दूर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपित विचारी
भरून काजव्यांनी हा
चमके पिंपळ सारा
स्तिमित होऊनी तेथे
अवचित थबके वारा
किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी
मध्येच क्षितीजावरुनी
वीज लकाकूनी जाई
अन् ध्यानस्थ गिरी ही
उघडूनी लोचन पाही
हळूच चांदणे ओले
ठिबके पानावरुनी
कसला क्षण सोनेरी
उमले प्राणामधूनी
संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मौनाचा गाभारा
कवी - मंगेश पाडगावकर
शेवटची ओळ "मनाचा गाभारा" अशी हवी
ReplyDeleteमूळ कविता आणि पा.पु.म.नि. च्या बाल भारती पुस्तकात सुद्धा मौनाचाच गाभारा आहे. क.लो.अ. :)
ReplyDeleteखूप छान
ReplyDelete७ वी पा होती ही कविता
ReplyDelete