Wednesday, 12 January 2011

बाभळी

लवलव हिरवीगार पालवी काट्यांची वर मोहक जाळी
घमघम करिती लोलक पिवळे फांदी तर काळोखी काळी

झिरमिर झरती शेंगा नाजूक वेलांटीची वळणे वळणे
त्या सार्‍यातूनी झिरमिर झरती रंग नभाचे लोभसवाणे

कुसर कलाकृती अशी बाभळी तिला न ठावी नागररिती
दूर कुठेतरी बांधावरती झुकून जराशी उभी एकटी

अंगावरती खेळवी राघू लागट शेळ्या पायाजवळी
बाळ गुराखी होऊनीया मन रमते तेथे सांज सकाळी

येथे येऊन नवेच होऊन लेऊन हिरवे नाजूक लेणे
अंगावरती माखूनी अवघ्या धुंद सुवासिक पिवळे उटणे

- कवयित्री इंदिरा संत

मानसा मानसा,
तुझी नियत बेकार,
तुझ्याहून बरं
गोठ्यातील जनावर (मानूस)

पाहीसनी रे लोकाचे
यवहार खोटे नाटे
तव्हा बोरी बाभयीच्या
आले अंगावर काटे (हिरिताचं देनं घेनं)

- बहिणाबाई चौधरी.

सागर


आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे

फेसफुलांचे सफेद शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्‍याकडे

मऊ मऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणार्‍या वार्‍याच्या संगती

संथ सावळी दिसती केव्हा क्षितिजावर गल्बते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते

तुफान केव्हा भांडत येते सागरही गर्जतो
त्या वेळी मी चतुरपणाने दूर जरा राहतो

खडकावरुनी कधी पाहतो मावळणारा रवी
ढगाढगाला फुटते तेव्हा सोनेरी पालवी

प्रकाशदाता जातो जेव्हा जळाखालच्या घरी
नकळत माझे हात जुळोनी येती छातीवरी

दर्यावरची रंगीत मखमल उचलून घेते कुणी
कृष्ण सावल्या भुरभुर पडती गगनाच्या अंगणी

दूर टेकडीवरी पेटती निळे तांबडे दिवे
सांगतात ते मजला आता घरी जायला हवे

कवी - कुसुमाग्रज

प्रिय गुरुजी

प्रिय गुरुजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात,
नसतात सगळीच सत्यनिष्ठ
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी
मात्र त्याला हे देखील शिकवा
जगात प्रत्येक बदमाशागणिक
असतो एक साधुचरित पुरुषोत्तम.
स्वार्थी राजकारणी असतात जगात
तसे असतात अवघं आयुष्य समर्पित करणारे नेते
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही.

मला माहित आहे
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत...
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.
हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा त्याला विजयाचा आनंद संयमाने घ्यायला
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेष मत्सरापासून दूर राहायला शिकवा
शिकवा त्याला आपला हर्ष संयमाने व्यक्त करायला

गुंडांना भीत जाऊ नकोस म्हणावं,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !

जमेल तेवढं दाखवित चला त्याला
ग्रंथ भाण्डाराचं अद्भुत वैभव,
मात्र त्या बरोबरच
मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा
सृष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला.
पाहू दे त्याला
पक्षांची अस्मान भरारी...
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर...
आणि हिरव्यागार डोंगरउतारावर डोलणारी चिमुकली फुलं.

शाळेत त्याला हा धडा मिळू दे -फसवून मिळवलेल्या यशापेक्षा
सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.

आपल्या कल्पना आपले विचार
यांच्यावर दृढविश्वास ठेवायला हवा त्यानं
बेहत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी.
त्याला सांगा त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्दल घडवावी.
माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणार्‍या
भाऊगर्दीत सामील न होण्याची ताकद
त्यानं कमवायला हवी.
पुढे हेही सांगा त्याला
ऐकावं जनांचं अगदी सर्वांचं...
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून,
आणि फोलपट टाकून निव्वळ सत्य तेव्हढं स्वीकारावं.

जमलं तर त्याच्या मनावर बिंबवा -
हसत राहावं उरातलं दु:ख दाबून.
आणि म्हणावं त्याला,
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नको.

त्याला शिकवा तुच्छतावाद्यांना तुच्छ मानायला
अन् चाटुगिरीपासून सावध राहायला.
त्याला हे पुरेपुर समजवा की करावी कमाई त्यानं
ताकद आणि अक्कल विकून पण कधीही विक्रय करू नये
हृदयाचा आणि आत्म्याचा !

धिक्कार करणार्‍यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला,
आणि ठसवा त्याच्या मनावर –
जे सत्य आणि न्याय्य वाटते
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.

त्याला ममतेनं वागवा पण लाडावून ठेऊ नका.
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा
अधीर व्हायचं धैर्य,
आणि धरला पाहिजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य.
आणखीही एक सांगत राहा त्याला –
आपला दृढ विश्वास पाहिजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रद्धा मानव जातीवर.

माफ करा गुरुजी ! मी फार बोलतो आहे,
खूप काही मागतो आहे... पण पहा..
जमेल तेव्हढं अवश्य कराच.

माझा मुलगा - भलताच गोड छोकरा आहे हो तो.

- श्री. अब्राहम लिंकन
- अनुवाद कवि श्री. वसंत बापट

कालच सकाळी मराठीच्या तासाला

कालच सकाळी मराठीच्या तासाला,
पहिल्या बाकावरील तिने
वळून पाहिले मला,
दोन्ही बाजूने कोपरखळ्या आल्या
आणि शब्द मध्येच
"मजा आहे तुझी साल्या"

मग मी ही लिहिलं एक प्रेमपत्र,
'प्रिये तुझ्या प्रीतीस होईन का ग पात्र?'

संध्याकाळी निघालो
तिच्या भेटीला,
डोळे लाऊन बसलो
तिच्या घरी जायच्या वाटेला,

एव्हढ्यात तिची सुंदर सावली
रस्त्यावर पडली
अन् माझ्या हातातल्या गुलाबाची
प्रत्येक पाकळी थरथरली,

हृदयाचे दरवाजे लागले धडधडू,
'तिच्याशी बोलायला विषय कसा काढू?'
एव्हढ्यात एका गुंडाने तिची छेड काढली
अन् त्या गुंडाची कानफडं रंगली..

तिने धावत येऊन माझा हात धरला,
'आता स्वर्ग मला दोनच बोटे उरला'

पण क्षणातच या सुखाला
झालो मी पारखा,
कारण ती म्हणाली,
"कसा रे धावून आलास,
पाठच्या भावासारखा..."

- कवि अज्ञात.

श्रावण आला


हसरा, नाचरा,
जरासा लाजरा,
सुंदर साजिरा,
श्रावण आला

तांबुस, कोमल,
पाऊल टाकीत,
भिजल्या मातीत,
श्रावण आला

मेघांत लावीत,
सोनेरी निशाणे,
आकाशवाटेने
श्रावण आला

वार्‍याच्या संगती,
खेळत लाटांशी,
झिमझिम धारांशी,
श्रावण आला

लपत छपत,
हिरव्या रानात,
केशर शिंपित,
श्रावण आला

इंद्रधनुष्याच्या
बांधीत कमानी,
संध्येच्या गगनी,
श्रावण आला

लपे ढगामागे,
धावे माळावर,
असा खेळकर,
श्रावण आला

सृष्टीत सुखाची,
करीत पेरणी,
आनंदाचा धनी,
श्रावण आला

- कुसुमाग्रज

तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु

तुम्ही आम्ही सकल हिंदू बंधु बंधु !
तो महादेवजी पिता आपुला, चला तयाला वंदू!!

ब्राह्मण वा क्षत्रिय, चांग जरी झाला !
कसलेही रूप व रंग जरी ल्याला !
तो महार अथवा मांग सकलाला !
ही एकची आई हिंदुजाती आम्हांस, तिला वंदू!!

एकची देश हा अपुल्या प्रेमाचा!
एकची छंद जीवाच्या कवनाचा!
एकची धर्म हा आम्हा सकलांचा!
ही हिंदू जातीची गंगा, आम्ही तिचे सकल बिंदू !!

रघुवीर रामचंद्रांचा जो भक्त !
गोविन्दपदाम्बुजी जो जो अनुरक्त !
गीतेसी गाऊनी पूजी भगवंत !
तो हिंदू धर्म, नौकेत बसुनिया तरतो भवसिंधू !!

उभयांनी दोष उभयांचे खोडावे !
द्वेषासी, दुष्ट रुढीसी सोडावे!
सख्ख्यासी आईच्यासाठी जोडावे !
आम्ही अपराधांसी विसरुनी, प्रेमा पुन्हा पुन्हा सांधू!!

लेकुरे हिंदू जातीची हि आम्ही !
आमुच्या हिंदू धर्मासी त्या कामी !
प्राणही देऊनी रक्षू परिणामी !
ह्या झेंड्याखाली पूर्वजांचीया, एकाची नांदू !!

स्वातंत्र्यवीर सावरकर. रत्नागिरी - १९२५

संथ निळे हे पाणी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
कुरळ्या लहरींमधूनी
शीळ घालतो वारा

दूर कमान पुलाची
एकलीच अंधारी
थरथरत्या पाण्याला
कसले गुपित विचारी

भरून काजव्यांनी हा
चमके पिंपळ सारा
स्तिमित होऊनी तेथे
अवचित थबके वारा

किरकीर रात किड्यांची
निरवतेस किनारी
ओढ लागुनी छाया
थरथरते अंधारी

मध्येच क्षितीजावरुनी
वीज लकाकूनी जाई
अन् ध्यानस्थ गिरी ही
उघडूनी लोचन पाही

हळूच चांदणे ओले
ठिबके पानावरुनी
कसला क्षण सोनेरी
उमले प्राणामधूनी

संथ निळे हे पाणी
वर शुक्राचा तारा
दरवळला गंधाने
मौनाचा गाभारा


कवी - मंगेश पाडगावकर