Friday, 30 August 2013
नेमेची येतो मग पावसाळा
केला रवीने निज ताप दूर,
वाहे हराया श्रम हा समीर |
वैशाखमासी प्रतिवर्षी येती
आकाशमार्गे नव मेघपंक्ती |
नेमेची येतो मग पावसाळा,
हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा..||
- कवि अज्ञात
सृष्टीला पाचवा महिना..
समुद्र बिलोरी आईना, सृष्टीला पाचवा महिना,
कटीस अंजिरी नेसू, गालात मिश्कील हासू,
लावण्य जात असे ऊतू, जीवाची होते गं दैना,
सृष्टीला पाचवा महिना..
- बा. भ. बोरकर
Sunday, 16 June 2013
व्याकुळ संध्यासमयी
त्या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे मी अपुले हात उजळतो.- कवि ग्रेस
मंद वास
एक झुळुक वार्याची आली भाताच्या शेतातून मंद वास घेऊन- "हायकु सप्तरंगी'' (पुस्तक) - कवि श्री. राजन पोळ.
Friday, 15 June 2012
आमच्या नशीबाची चाल...
आमच्या नशीबाची चाल... बुद्धिबळातल्या उंटासारखी... तिरकी. लोकांची सरळ चालणारी नशीबं पाहिली की मला त्यांचा हेवा वाटतो. ठरलेल्या रूळावरून जाणार्या ट्राम गाडी सारखी ही ६ नंबर, ७ नंबर ची माणसं आयुष्याचा प्रवास थोड्याश्या मंदगती करत असतील पण संसाराच्या शेवटी इष्टस्थळी जाऊन पोहोचतात. रितसर रिटायर होतात, पुण्याला घर बांधतात, त्यांना दोन मुलगे आणि एकच मुलगी अशी 'बेतशुद्ध' संतती असते. त्यातला एक इंजिनीयर होतो, दुसरा डॉक्टर होतो, मुलगी प्रेमविवाह करून बापाला हुंड्याच्या रकमेतून वाचवते, जावई देखील सद्गुणी असतो, असल्या लोकांना कॅज्युअल लिव्ह सुद्धा रविवारला जोडून मिळते, ह्यांच्या घरचे दुधवाले दुधात पाणी घालत नाहीत, रामा गडी गौरी गणपतीला कोकणात गेले तरी पाचव्या दिवशी परततात. आमचा रामा गौरीला म्हणून जो जातो तो शिमगा झाला तरी बेपत्ता.
- असा मी असामी
- पु.ल. देशपांडे.
थांब उद्याचे माऊली
पोरसवदा होतीस
कालपरवा पावेतो;
होता पायांतही वारा
कालपरवा पावेतो.
आज टपोरले पोट
जैशी मोगरीची कळी;
पडे कुशीतून पायीं
छोट्या जीवाची साखळी.
पोरसवदा होतीस
कालपरवा पावेतो;
थांब उद्याचे माऊली
तीर्थ पायाचे घेईतों!
-बा. सी. मर्ढेकर
कविता सौजन्य - http://
चित्र सौजन्य - esakal.com
वाकून टाक सडा
वाकून टाक सडा,
गं राधे जरा, वाकून टाक सडा ।। धृ ।।
केस कुरळे उडतील भुरूभुरू,
आवळून बांध बुचडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।१।।
शेणाचे शिंतोडे अंगावर उडतील,
पदर खोच कमरेला, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।२।।
गावातील लोक टकमक बघतील,
थुंकून टाक विडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।३।।
एका जनार्दनी पूर्ण कृपेने,
श्रीरंग माझा वेडा, गं राधे जरा, वाकून टाक सडा ।।४।।
इथे ऐका ही गवळण - http://www.loksangeet.com/
Subscribe to:
Posts (Atom)




