Sunday, 22 September 2013
अनौरस सुख
दाराशी पोरकं
गोजिरं बाळ
रडत असावं
तसं अनौरस सुख
अनेकदा येतं आयुष्यात...
उचलावं तर
ते आपलं नसल्याचं भय
अन्
पाठ फिरवावी तर
त्याच्या मोहमुठीत
अडकलेला पदर...
- कवयित्री संजीवनी बोकील
कविता सौजन्य - http://ek-kavita.blogspot.in/2011/05/blog-post_09.html
नाना पातळ्या मनाच्या...
नाना पातळ्या मनाच्या
आणि चढायला जिने
वर वर जावे तसे
हाती येतात खजिने
नाना पातळ्यांवरून
नाना जागांची दर्शने
उंचीवरून बघता
दिसे अमर्याद जिणे
उंच पातळीवरून
दिसतात स्पष्ट वाटा
वर जावे तसा होतो
आपोआप नम्र माथा
नाना पातळ्यांवरती
नाना लढतो मी रणे
होता विजयी; बांधितो
दारावरती तोरणे
- कवि म. म. देशपांडे.
कविता सौजन्य - http://ek-kavita.blogspot.in/2011/08/blog-post_11.html

घाई करु नकोस...
पांढरे निशाण उभारायची
घाई करु नकोस.
मूठभर हृदया...
प्रयत्न कर
तगण्याचा... तरण्याचा...
अवकाश भोवंडून टाकाणार्या
या प्रलंयकारी वादळाचाही
एक अंत आहे.
काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत
लढत रहा...
तुझ्या नाजुक अस्तित्वानिशी...!!
वादळे यासाठीच वापरायची असतात
आपण काय आहोत,
हे तपासण्यासाठी नव्हे,
काय होऊ शकतो
हे आजमावण्यासाठी...!!
कवयित्री - संजीवनी बोकील.
कविता सौजन्य - http://ek-kavita.blogspot.in/
चित्र सौजन्य - अंतर्जाल.

Subscribe to:
Posts (Atom)