Sunday, 1 December 2013

एक स्थानबद्ध आनंदी कैदी मी...

मला जाणीव आहे, मला पुष्कळ काही करायचे आहे, बऱ्याच काही गोष्टींकडे लक्ष पुरवायचे आहे. कपडे धुवायचे बाकी आहेत, ओटा साफ करायचा आहे, केर काढायचा राहून गेला आहे आणि कपबश्या पण विसळायच्या आहेत. पण खरोखरच मी हे सारे तडकाफडकी करायला घेऊ शकत नाही., कारण तुम्ही पाहताच आहात की माझा बोका माझ्या मांडीवर बसला आहे. तो शरीर ताणतो, कूस बदलतो आणि माझ्याकडे हळूच तिरप्या नजरेने पाहतो. त्याच्या झोपाळलेल्या सोनेरी डोळ्यांची हलकेच उघडझाप करतो. मी त्याच्या लांबलचक शेपटीचे केस छान लावते आणि मायेने त्याच्या पोटाला हळूच गुदगुल्या करते. तो एक मोठी जांभई देतो आणि लडिवाळपणे गुरगुरून सारे काही आवडल्याची पोच देतो. फोन वाजतो, दारावर थाप पडते, पण मी हलूच शकत नाही कारण माझा बोका माझ्या मांडीवर आहे. छानसा ऊन्हाचा कवडसा आला आहे, जणू काही माझ्या ह्या मित्राला थोडी अजून उब द्यायला. एक स्थानबद्ध आनंदी कैदी आहे मी... काही क्षण स्तब्धतेचे, निर्विकल्प. मला वाटते की मी एक छोटीशी डुलकी घेईन, ह्या मऊमऊ लोकरीच्या गोळ्या सोबत, मांडीवर असलेल्या माझ्या बोक्या सोबत. मूळ कविता - श्रीमती करेन बॉक्सेल. (स्वैर अनुवादित)

Sunday, 22 September 2013

अनौरस सुख

दाराशी पोरकं गोजिरं बाळ रडत असावं तसं अनौरस सुख अनेकदा येतं आयुष्यात... उचलावं तर ते आपलं नसल्याचं भय अन् पाठ फिरवावी तर त्याच्या मोहमुठीत अडकलेला पदर... - कवयित्री संजीवनी बोकील कविता सौजन्य - http://ek-kavita.blogspot.in/2011/05/blog-post_09.html

नाना पातळ्या मनाच्या...

नाना पातळ्या मनाच्या आणि चढायला जिने वर वर जावे तसे हाती येतात खजिने नाना पातळ्यांवरून नाना जागांची दर्शने उंचीवरून बघता दिसे अमर्याद जिणे उंच पातळीवरून दिसतात स्पष्ट वाटा वर जावे तसा होतो आपोआप नम्र माथा नाना पातळ्यांवरती नाना लढतो मी रणे होता विजयी; बांधितो दारावरती तोरणे - कवि म. म. देशपांडे. कविता सौजन्य - http://ek-kavita.blogspot.in/2011/08/blog-post_11.html

घाई करु नकोस...

पांढरे निशाण उभारायची घाई करु नकोस. मूठभर हृदया... प्रयत्न कर तगण्याचा... तरण्याचा... अवकाश भोवंडून टाकाणार्‍या या प्रलंयकारी वादळाचाही एक अंत आहे. काळाच्या त्या निर्णायक बिंदूपर्यंत लढत रहा... तुझ्या नाजुक अस्तित्वानिशी...!! वादळे यासाठीच वापरायची असतात आपण काय आहोत, हे तपासण्यासाठी नव्हे, काय होऊ शकतो हे आजमावण्यासाठी...!! कवयित्री - संजीवनी बोकील. कविता सौजन्य - http://ek-kavita.blogspot.in/ चित्र सौजन्य - अंतर्जाल.

Friday, 30 August 2013

नेमेची येतो मग पावसाळा

केला रवीने निज ताप दूर, वाहे हराया श्रम हा समीर | वैशाखमासी प्रतिवर्षी येती आकाशमार्गे नव मेघपंक्ती | नेमेची येतो मग पावसाळा, हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा..|| - कवि अज्ञात

सृष्टीला पाचवा महिना..

समुद्र बिलोरी आईना, सृष्टीला पाचवा महिना, कटीस अंजिरी नेसू, गालात मिश्‍कील हासू, लावण्य जात असे ऊतू, जीवाची होते गं दैना, सृष्टीला पाचवा महिना.. - बा. भ. बोरकर

Sunday, 16 June 2013

व्याकुळ संध्यासमयी

त्या व्याकुळ संध्यासमयी शब्दांचा जीव वितळतो. डोळ्यांत कुणाच्या क्षितिजे मी अपुले हात उजळतो.
- कवि ग्रेस

मंद वास

एक झुळुक वार्‍याची आली भाताच्या शेतातून मंद वास घेऊन
- "हायकु सप्तरंगी'' (पुस्तक) - कवि श्री. राजन पोळ.